मुंबईतील गिरगाव येथील दोन वर्षांची चिमुरडी सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. तांदळाच्या डब्यात उंदीर आणि किटकांपासून संरक्षणासाठी ठेवलेल्या अल्युमिनियम फॉस्फाईड या विषारी कीटकनाशकाच्या वासामुळे दोन वर्षाच्या चिमुरडीची मृत्यूशी झुंज देत आहे.
ॲल्युमिनियम फॉस्फाईड या विषारी कीटकनाशकाच्या वासामुळे विषबाधा झाल्यामुळे तिला 15 तासांच्या कालावधीत तब्बल तीन वेळा हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या वासामुळे तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. या गंभीर अवस्थेत तिला हाजी अली येथील एनएच एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या ती अॅडव्हान्स लाईफ सपोर्टवर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2 वर्षीय आर्वीकाला 11 जून रोजी उलट्या आणि जुलाब होऊ लागले. पालकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आव्हाड दामपत्य पेशाने इंजिनिअर असून अलिभाई प्रेमजी मार्ग येथील बोहोरी बिल्डिंगमध्ये राहतात. रुग्णालयात काही फरक जाणवला नाही म्हणुन 13 जून रोजी हाजीअली येथील SRCC चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 15 तारखेपर्यंत डॉक्टरांनी उपचार केले मात्र त्यानेही फरक पडला नाही. डॉक्टरांनी घरच्यांची विचारपूस केली… पाण्यात…जेवणात काही बदल झाले का असं विचकरलं. त्यावर पालकांनी घरामध्ये तांदळाला कीड लागू नये म्हणुन आणि उंदरानापासून सुरक्षित राहावे म्हणुन कीटकनाशकाची पुडी ठेवण्यात आली होती अशी माहिती दिली.
दरम्यान मुलीच्या नातेवाईकांपैकी एका डॉक्टरांनी घरातील तांदळाच्या साठवणुकीत ॲल्युमिनियम फॉस्फाइडच्या पुड्या ठेवण्यात आल्याची माहिती दिली. या पुड्या ठेवल्यानंतर घरात तीव्र वास येत होता आणि त्यानंतरच दोन्ही मुलांना त्रास सुरू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या दृष्टिकोनाने डॉक्टरांचे सध्या उपचार सुरू आहेत.सध्या आर्वीकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून पुढील 48 तास व्हेंटिलेटरवरच अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार आहेत. 48 तासानंतर तो व्हेंटिलेटर काढून अर्विकाच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली आहे का? हे तपासून पुढील निर्णय घेण्यात येईल. या घटनेप्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
ॲल्युमिनियम फॉस्फाईड म्हणजे काय?
ॲल्युमिनियम फॉस्फाइड हे एक अतिशय विषारी रसायन आहे. भारतात याचा वापर प्रामुख्याने धान्य साठवणीत कीड नियंत्रणासाठी (fumigant) केला जातो. हे गोळ्या किंवा पावडरच्या स्वरूपात मिळते. ॲल्युमिनियम फॉस्फाइड हवेतल्या किंवा पाण्यातल्या आर्द्रतेच्या संपर्कात आले की फॉस्फीन (Phosphine) नावाचा अत्यंत विषारी वायू सोडते. हा वायू शरीरासाठी खूप घातक असतो. हे सर्वात घातक कीटकनाशकांपैकी एक मानले जाते. अगदी कमी प्रमाणात सेवन केले किंवा त्याचा वायू जास्त प्रमाणात श्वासातून गेला तरी जीवाला धोका होऊ शकतो. विषबाधा झाल्यास त्वरित रुग्णालयात नेणे अत्यावश्यक असते.