पावसाळा सुरु होताच लागोपाठ सणांची लगबग सुरु होते. हिंदू संस्कृतीत सण म्हंटल की वेगवेगळे उपवास ही आलेच. मात्र उपवासाचे काही विशिष्ट पदार्थ खाऊन आता आपल्याला कंटाळा आलाय. अशा वेळी उपवासाला साबुदाण्याची खिचडी आणि वडे हे तर आपण खातोच, पण आज आपण काहीतरी वेगळा पदार्थ जाणून घेणार आहोत. तर जाणून घेऊया साबुदाण्याचे थालीपीठ बनवण्याची पाककृती.
साबुदाण्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१. भिजवून घेतलेले साबुदाणे – ३ वाट्या
२. उकडलेले बटाटे – ३
३. हिरव्या मिरच्या – ५-६
४. शेंगदाण्याचा कूट – १ वाटी
५. मीठ – चवीनुसार
६. तेल/तूप – अंदाजानुसार
७. लिंबाचा रस – १ चमचा
८. थालीपीठ थापण्यासाठी प्लास्टिकचा कागद
कृती : शेंगदाणे तव्यावर हलके भाजून घ्यावेत त्यानंतर हातावर चोळून शेंगदाण्याची सालं काढावीत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. त्यानंतर हिरव्या मिरच्या देखील मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात. त्यानंतर बटाटे नीट उकडून घ्यावेत आणि नंतर ते एका ताटात काढून कुस्करुन घ्यावे.
कुस्करलेल्या बटाट्याच्या मिश्रणात भिजवलेले साबुदाणे, हिरव्या मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस घालावे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून हाताने मळून घ्यावे. त्यानंतर मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करुन घ्यावेत. मिश्रण छान मळून झाल्यानंतर या तयार पिठाचे थालीपीठ थापताना पोळपाटावर प्लॅस्टिकचा कागद किंवा कॉटनचा रुमाल पाण्यात भिजवून ओला करून अंथरावा. त्यानंतर आता या प्लॅस्टिकवर किंवा ओल्या रुमालावर अलगद हातांनी थालीपीठ थापून घ्यावे. हे थालीपीठ थापताना हाताला थोडे पाणी लावावे.त्यामुळे थालीपीठ हाताला चिटकणार नाहीत.
गोलाकार आकारात थालीपीठ थापून घेतल्यांनंतर तव्यावर घालून खरपूस भाजून घ्या. विशेष म्हणजे थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करा.
त्यानंतर तव्यावर आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप सोडून मध्यम आचेवर थालीपीठ दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे. मग उपवासासाठी साबुदाण्याचे खुसखुशीत थालीपीठ तयार होतील. हे थालीपीठ दही किंवा सॉससोबत सर्व्ह करा