मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी : सध्या राजकारणात संपूर्ण पक्ष फुटण्याच्या घडामोडी घडत आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संताप आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या ८ आणि ९ जुलै रोजी राज्यभरात स्वाक्षरी मोहीम घेऊन ‘फक्त एक सही, संतापाची’ असे आंदोलन छेडणार असल्याची माहिती मनसेतर्फे देण्यात आली.दरम्यान अमित ठाकरेंनी सही करत या अभियानात सहभाग नोंदवली आहे. सहभाग घेतल्यावर माध्यमाशी बोललना अमित ठाकरे म्हणाले की, ठाकरेपैकी एक भाऊ सत्तेत बसला पाहिजे. तसेच लोकांच्या मनातील राजकीय घडामोडीवरील संताप राजकारण करणाऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी हे अभियान असल्याचे ही अमित ठाकरे म्हणाले.
दरम्यान ठाकरे बंधूच्या युतीवरून बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, मनसेकडून दोन वेळा मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या गटात युतीचे प्रयत्न झालेत. पण आता दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सचेत बसणे जास्त गरजेचे आहे. आणि तो एक भाऊ म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत, असे अमित ठाकरे म्हणाले, तसेच आता राजकीय चिखलात राज ठाकरे है खबीरपणे उभे आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत आमच्या बाजूने निकाल दिसेल, असा आशावाद ही अमित ठाकरेंनी व्यक्त कैला.
शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडून भाजपसोबत गेल्यानंतर जनतेकडून तीव्र भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आल्या. ही बाब ताजी असतानाच आता राष्ट्रवादी कांॅग्रेस शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाली. या दोन्ही पक्षात गटाबाजी उफाळली. या राजकीय परिस्थितीबाबत जनतेच्या मनात चीड निर्माण झालेली आहे. हे हेरण्याचा मनसे प्रयत्न करत आहे. जनतेच्या आलेल्या प्रतिक्रिया, भावना पक्षासाठी महत्वपूर्ण असणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यातील राजकारणावर प्रतिक्रिया म्हणून हा उपक्रम सुरु केला आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर सर्वसामान्यांना संताप व्यक्त करुन देण्यासाठी मनसेने हा उपक्रम सुरु केला आहे. सर्वसामान्य जनतेला गृहीत धरून सर्व राजकारण सुरू आहे. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने ही मोहीम सुरु केली गेली आहे.