काँग्रेसच्या सोनिया गांधी यांना मुलाला सेट करायचे आहे आणि जावयाला भेट द्यायची आहे, अशा स्वरुपाचे वक्तव्य भाजपच्या निशिकांत दुबे यांनी केले. लोकसभा खासदार निशिकांत दुबे यांनी सभागृहात बोलताना हे वक्तव्य केले. याआधी संसदेत विरोधकांच्यावतीने काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर चर्चा करताना खासदार निशिकांत दुबे यांनी ‘मुलाला सेट आणि जावयाला भेट’ ही टिप्पणी केली.
विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे. पण ही आघाडी स्थापन करणारे विरोधक एकमेकांशी लढत आहेत. हा अंतर्गत संघर्ष सुरू असला तरी आघाडीचे नाव इंडिया असे ठेवले आहे, असेही लोकसभा खासदार निशिकांत दुबे म्हणाले.
काँग्रेस पक्षाला वैतागून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली, असेही खासदार निशिकांत दुबे म्हणाले. काँग्रेसने सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी सुरू केली. काँग्रेसने कायमच दुतोंडी कारभार केला आहे, अशा स्वरुपाची टीका दुबे यांनी केली.