मुंबई, १८ मे २०२३, प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव गटाकडून बैठकीचं सत्र सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाने मुंबईतील अनेक मतदारसंघात उमेदवार बदलण्याची तयारी केली आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहा असा आदेश मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. शिवसेना भवनवर झालेल्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली आहे. मुंबईतील लोकसभा मतदारसंघातील अनेक उमेदवार बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतून सध्याचे खासदार अरविंद सावंत यांच्या जागी राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या नावाची चर्चा असून त्यांना संधी दिली जाऊ शकते. तसंच अरविंद सावंत यांना उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या पूनम महाजन यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाऊ शकते.
माजी महापौर आणि आमदार सुनील प्रभू यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.