राज्यात परिक्षा प्रक्रियेवरून गदारोळ सुरु आहे. नुकताच नीट पेपरफुटीचं प्रकरण केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर निवळला असताना ठाण्यात टीईटीचा पेपर देखील फुटल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व घटना ताज्या असतानाच राज्यातील CET प्रवेश प्रक्रियेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यातील CET प्रवेश प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी क्लासच्या चालकाचा आणि विद्यार्थ्याच्या पालकाचा असल्याची सूत्रांची माहिती आहे. यात क्लास चालकाने विद्यार्थ्याच्या पालकांना 99 पर्सेंटाइल आण्याची गॅरंटी देतो असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सीईटी पर्सेंटाइल गुण वाढवून देण्याचा घोटाळा समोर आल्याचे पाहायला मिळत आहे.
यावेळी कथित ऑडिओमध्ये संबंधित क्लास चालक पालकाला म्हणाला की, “99 पर्सेंटाइल आणून देण्याची गॅरंटी देतो. आम्ही सांगू त्या सेंटरवर जाऊन परीक्षा द्या आणि पाहिजे ते सरकारी महाविद्यालय मिळवा. जे कॉलेज पाहिजे जी ब्रँच ती मिळवून देणार. सरकारी महाविद्यालयात प्रवेशाचे 12 ते 13 लाख रुपये लागतात” अशी ग्वाही संबंधित क्लास चालकाने विद्यार्थ्याच्या पालकाला दिली आहे.
हा कथित ओडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या प्रकरणाची संबंधित विभागाकडून कथित ऑडिओ क्लिपबाबत चौकशी करण्याची शक्यता आहे. दरम्यान या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाही. मात्र विद्यार्थी आणि पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.