राज्यात गेल्या महिनाभरापासून एका मागे एक अपघाताच्या घटना घडत आहेत. भीषण अपघातांची साखळी लागलेली असताना पुण्यातून एक हादरून टाकणारी घटना घडली आहे. पुण्यातील राजगड पाहायला मुंबईहून निघालेली 20 पर्यटकांची खाजगी ट्रॅव्हल्स बस मध्यरात्री पाबे घाटातील खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात 20 पैकी 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर 18 प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.
मुंबईतील अंधेरी परिसरातील 20 जण ट्रेकिंगसाठी खाजगी ट्रॅव्हल्सने राजगड किल्ल्यावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांच्या बस चालकाचे एका धोकादायक वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अत्यंत भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सुमारास वेल्हा आणि खानापूर या परिसरात असलेल्या दुर्गम पाबे घाटात ट्रॅव्हल्स शेकडो फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमने तातडीने दरीत उतरून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले.
रेस्क्यू टीमने स्थानिक लोकांच्या मदतीने ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्या इतर प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. या दुर्घटनेनंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक, वेल्हे पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता अंधाऱ्या रात्री बचावकार्य राबवून सर्व जखमींना सुरक्षित बाहेर काढत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून बचावकार्यात सहभागी झालेल्या हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक, वेल्हे पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.