अकोला : महाराष्ट्र पोलिसांचे ‘सदक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य असले, तरी अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पोलिस दलावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून ती कोमात उपचार घेत आहे. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे हा अद्याप फरार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आरोपी हा बाळापूर पोलीस ठाण्यातच कार्यरत असल्याने स्थानिक पोलिसांनी त्याला फरार होण्यास मदत केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.