Ahmedabad Plane Crash: 'ज्याला आईचं संरक्षण लाभतं, त्याला कोणीही मारू शकत नाही,' या उक्तीचा प्रत्यय अहमदाबादमधील एका भीषण विमान अपघातातून समोर आला आहे. 12 जून रोजी एअर इंडियाचे बोईंग 171 विमान निवासी इमारतीवर कोसळले, ज्यामध्ये 260 लोकांचा बळी गेला. या भीषण दुर्घटनेत मृत्यूशी झुंज देणारा 8 महिन्यांचा चिमुकला ध्यानश आज आपल्या आईच्या बलिदानामुळे मृत्यूच्या दारातून सुखरूप परतला आहे.
मृत्यूच्या आगीत आई बनली 'कवच'
अपघाताच्या वेळी मनीषा कच्छडिया आणि त्यांचा 8 महिन्यांचा मुलगा ध्यानश बीजे मेडिकल कॉलेजच्या निवासी संकुलातील फ्लॅटमध्ये होते. विमान इमारतीवर कोसळताच प्रचंड स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा पसरल्या. मनीषा यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या मुलाला घट्ट मिठीत घेतले आणि स्वतःच्या शरीराने त्याला झाकून टाकले. कडक ऊन, दाट धूर आणि आगीच्या झळा सोसत मनीषा यांनी आपल्या मुलाचा जीव वाचवला. या दुर्घटनेतून वाचलेला ध्यानश हा सर्वात लहान मुलगा ठरला आहे.
पुनर्जन्मासाठी आईने दान केली स्वतःची त्वचा
या भीषण आगीत मनीषा 25 टक्के तर ध्यानश 36 टक्के भाजला होता. ध्यानशच्या जखमा अतिशय खोल (थर्ड डिग्री बर्न) होत्या. लहान मुलांच्या अंगावर पुरेशी त्वचा नसल्यामुळे त्याच्या उपचारासाठी मानवी त्वचेची गरज होती. अशा कठीण प्रसंगी, स्वतः भाजलेल्या अवस्थेत असतानाही मनीषा यांनी आपल्या मुलासाठी स्वतःची त्वचा दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. केडी हॉस्पिटलमधील प्लास्टिक सर्जन डॉ. रुत्विज पारिख यांनी 'स्किन ग्राफ्टिंग' प्रक्रियेद्वारे मनीषा यांच्या त्वचेचा वापर करून ध्यानशवर यशस्वी शस्त्रक्रिया केली.
हेही वाचा – Air Ticket prices : एअरलाइन्स कंपन्यांना सरकारचं गिफ्ट! पण ग्राहकांना फायदा मिळणार का?
पाच आठवड्यांचा संघर्ष आणि यशस्वी डिस्चार्ज
बीजे मेडिकल कॉलेजमध्ये युरोलॉजीचे शिक्षण घेणारे ध्यानशचे वडील कपिल कच्छडिया यांच्यासाठी हा काळ अत्यंत परीक्षेचा होता. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न आणि मनीषा यांची जिद्द यामुळे पाच आठवड्यांच्या सघन उपचारानंतर आई आणि मुलाची प्रकृती आता सुधारली आहे. गेल्या आठवड्यात या दोघांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. प्लास्टिक सर्जरी आणि योग्य उपचारांमुळे ध्यानशच्या जखमा आता भरून येत आहेत.