सध्या सर्वत्र आषाढी वारीची धामधूम सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही वारीचा अनुभव घेता यावा यासाठी पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील कलाशिक्षक संतोष क्षीरसागर यांनी शाळेत फलक लेखन करून मुलांना चित्ररूपी वारी घडविण्यासाठी प्रयत्न केला आहे.
वासुंदे येथील न्यू इंग्लिश स्कुलचे कलाशिक्षक संतोष क्षीरसागर हे वारीच्या या पर्वात दररोज वेगवेगळ्या चित्रांचे रेखाटन शाळेच्या फलकावर करतात त्यात एक अभंग घेतात आणि त्याला अनुसरून एक चित्र रेखाटतात. हे चित्र पाहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव तर मिळतोच सोबतच त्यांना अक्षररूपी आणि चित्ररूपी वारी देखील घडते. क्षीरसागर सरांनी याआधी “ज्ञानेश्वरी” ग्रंथाचे हस्तलिखित केले आहे. ज्याच्या जवळपास ४ हजार प्रति त्यांनी आतापर्यंत वितरित केल्या आहेत. त्यांना ही हस्तलिखित “ज्ञानेश्वरी” लिहिण्यासाठी अडीच वर्षांचा काळ लागला आहे. आता ते शाळेतील विद्यार्थ्यांना वारीचे महत्व चित्रांच्या माध्यमातून समजावून सांगत आहेत.