मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनौमढील कंपन्यांमध्ये आयकर विभागाचे छापे घालण्यात आले आहेत. ईडीकडून तपास सुरु असलेल्या पुष्पक बुलियन केसमध्ये नंदकिशोर चतुर्वेदींचे नाव समोर आले होते. चतुर्वेदी सध्या फरार असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना चतुर्वेदी यांनी कर्ज दिल्याचे समोर आले होते.
चतुर्वेदी हे उत्तर प्रदेशातील मथुराचे रहिवासी असून ते सीए आहेत. त्यांच्यावर नंदकिशोर हमसफर डीलर्स नावाची बनावट कंपनी चालवत असल्याचा आरोप आहे. याच कंपनीच्या नावाने उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना कर्ज दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. चतुर्वेदींवर हवाला व्यवहार, मनीलाँड्रिंग केल्याचाही आरोप आहे. तसेच, अनेक बनावट कंपन्या आणि कोलकात्यात कार्यालये तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. २०१७ पासून चतुर्वेदी हे ईडीच्या रडारवर आहेत.