आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मुंबईत मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत दाखल झाले आहेत. मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या राणा दाम्पत्यांच्या निर्णयावर मुंबईत राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले असून मातोश्रीबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
राणा दाम्पत्य मुंबईत आल्यानंतर शिवसैनकांनी त्यांचा पाठलाग सोडलेला नाही. सकाळपासून आतापर्यंत राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिक जमलेले असून आता त्यांनी भजनाला सुरूवात केली आहे. तसेच हातात टाळ व मृदंग घेऊन भजनाला करत राणा दाम्पत्य यांचा मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.
तसेच, दुसरीकडे राणा दाम्पत्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांनी वांद्रे परिसरात वांद्रे परिसरात शिवसैनिकांनी नवनीत राणा यांना आव्हान देणारे बॅनर्स लावले आहेत. नवनीत राणा यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वांद्रे परिसरात पाऊल ठेऊनच दाखवावे. शिवसैनिक सज्ज आहेत, असे बॅनर्स शिवसैनिकांकडून लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’ बाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी मध्यरात्री मातोश्रीच्या समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग केलं आहे.
राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत, शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाणारच, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार यावर राणा दाम्पत्य ठाम आहेत. तसेच आम्ही पोलिसांना सहकार्य करणार असून कायदा-सुव्यवस्था बिघडू देणार नाही, असे राणा दाम्पत्यांनी जाहीर केले आहे.