इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीमध्ये नदी घाटावर स्वच्छ करत असताना राष्ट्रीय सेवा दल यांना एका पोत्यामध्ये आधार कार्ड भरलेले व काही कागदपत्रे सापडल्यामुळे खळबळ माजली आहे याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करून सर्व आधार कार्ड ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू केला आहे. दीड महिन्यांमध्ये हजारो रेशन कार्डचा ढीग सापडल्यानंतर आता आधारकार्ड सापडल्याने यामध्ये मोठं रॅकेट आहे का? याची चर्चा सुरु झाली आहे.
रविवारी आधार कार्डचा गंभीर प्रकार आढळून आला. आधार कार्डवरील बहुतांश नागरिकांचे वय साधारण ६० ते ६५ वयापर्यंत आहे. त्यामुळे पेन्शन मंजुरीच्या हेतूने आधार कार्डवर वय वाढवण्याचे प्रकारही सुरु आहेत. त्यासाठी हा प्रकार सुरु आहे का? अशीही चर्चा आहे. पंचगंगा नदी पात्रात स्वच्छता करत असताना राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांना हे पोतं तरंगताना दिसल्याने बाहेर काढले. इतक्या मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड नदीत सापडल्याने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सापडलेली सर्व आधार कार्ड इचलकरंजी शहर आणि परिसरातील असल्याचे समजते. इचलकरंजी परिसरात आधार कार्ड आणि रेशन कार्डचा ढीग सापडत चालल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आधार कार्ड बाहेर काढल्यानंतर सर्व ओरिजिनल असल्याचे समजते. इचलकरंजी शहरासह जवाहरनगर, कोरोची, कबनूर भागातील आहेत. आधार कार्डवरुन काहींना संपर्क करण्यात आल्यानंतर त्यांनी ती आपल्याकडेच सांगितले. दरम्यान, आधार कार्ड तयार करण्याची काही नावे समोर आली असून पोलिसांनी त्यांची चौकशी सुरु केली आहे. या संदर्भातील अहवाल तहसीलदारांना पाठवण्यात येणार आहे.