कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा मंदिरातून मोठा घोटाळा समोर आला आहे. कोल्हापूरातील संत बाळूमामा मंदिरात महाराष्ट्रातील लाखो भाविक दर्शनासाठी जातात. असं असताना याच मंदिरातून तब्बल 60 कोटी 75 लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणी एफआयआर दाखल होताच महिला अधिकारी फरार झाल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिरात चोरीचा प्रकार समोर येताच उपनिबंधक रागिणी (रोहिणी) खडके यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच खडके फरार झाल्या असून अद्याप त्या पोलिसांच्या हाती लागल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याचसोबत तक्रारदार अरुण हत्ती आणि प्रवीण पाटील यांनी धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यासर्व प्रकरणाचे कर्ताधर्ता तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार हेच असल्याचा थेट आरोप केला आहे.
याप्रकरणासंबंधी काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यानुसार, देवस्थानाच्या 23 जमिनींची मालकी आणि कागदपत्रांमध्ये मोठे तफावत आढळले आहे. तसेच 20 लाखांची जमीन दुरुस्ती दस्ताद्वारे थेट 3 कोटी रुपयांना दाखवून निधी दडपला. दानपेटी, पशुधन विक्री व इतर मार्गाने येणाऱ्या कोट्यवधींच्या देणगीचा अधिकृत हिशेब गायब आहे. उत्पन्न आणि खर्चासाठी दोन वेगवेगळ्या नोंदवह्या वापरल्या असून आर्थिक फेरफार केली आहे.
भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे वजन, नोंद व विक्रीची माहिती गहाळ आहे. तसेच एफआयआरनुसार बनावट कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात आणि पुराव्यांत फेरफार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व आरोपांवर संबंधितांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नसून, तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान राज्यातील मंदिरांमधील हा कदाचित सर्वात मोठा गैरव्यवहार मानला जात असून, निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाशी संबंधित गंभीर कागदपत्रे आणि एफआयआरची प्रत समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित यंत्रणांनी चौकशी सुरू केली असून, आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी केली जात आहे. या घोटाळ्यामुळे भाविकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.