भाजपचे आमदार गोपाचंद पडळकर हे सातत्याने शरद पवार यांच्यावर गरळ ओकत आहेत. त्यांची हिंमत इतकी वाढली आहे की, त्यांनी यावेळी देशाचे तुकडे करण्याची भाषा करत देशद्रोह केला आहे. त्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस ने पुणे पोलिसांना केली आहे.
अधिवेशनातील शेवटच्या दिवशी विधान परिषदेत झालेल्या भाषणात व इंदापूर येथील झालेल्या सभेत भाषण करताना हा गुन्हा पडळकर यांनी केला आहे.लवासा, बारामती व मगरपट्टा हे तीन वेगवेगळे राज्य करण्यात यावे. या तिन्ही राज्यांचे वेगवेगळे मुख्यमंत्री असावेत आणि या तिन्ही राज्यांचा मिळून एक वेगळा देश निर्माण करावा ज्याचे पंतप्रधान पवार साहेबांना करावे, असे वक्तव्य करत देशाचे तुकडे करण्याची भाषा केली आहे.त्यांचे हे वक्तव्य भारताच्या संघराज्य व्यवस्थेला छेद देणारे असून याबाबत गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
तसेच इंदापूर येथील जाहीर सभेत बोलताना “पवार हे या देशाला लागलेली कीड आहे” , असे वक्तव्य करत पवार आडनाव असलेल्या अठरापगड जाती -धर्मातील विविध कुटुंबीयांचा व त्यांच्या जातीचा अवमान केला आहे.यापैकी आदिवासी व मागासवर्गीय या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी वडार समजाचे महेश पवार व घिसाडी समाजाचे माधव पवार यांनी त्यांच्या आडनाव व समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी करण्यात येत आहे.