गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात अनेक पक्षांच्या नेत्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरदार सुरु आहे. सर्वत्र बैठका आणि मेळावे घेतले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची गडबड सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर आणि 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. अमित ठाकरे नवी मुंबईतील कौपरखैरणे येथे मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी गेले होते. त्यावेळी नवी मुंबईच्या नेरुळमध्ये राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या चार महिन्यांपासून कापडाने झाकून ठेवला असल्याचं अमित ठाकरे यांना समजलं.
त्यानंतर त्यांनी परवानगी न घेता त्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यांनी तात्काळ मनसैनिकांच्या मदतीने पोलिसांच्या डोळ्यादेखत पुतळ्याचं अनावरण केलं. या पुतळ्याचे अनावरण करताना पोलीस आणि मनसैनिक यांच्यामध्ये झटापट झाली यादरम्यान त्याठिकाणी गोंधळ निर्माण झाला. परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ भव्य पुतळ्याचे उद्घाटन केल्यामुळे आणि जमावबंदीचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनसेनेते अमित ठाकरे यांच्यावर आतापर्यंतचा हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.
मनसेने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अमित ठाकरेंनी म्हटले की, "महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या भूमीत… महाराजांचा हा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही! आज नवी मुंबईत शाखा उद्घाटनासाठी गेलो असताना समजलं की तब्बल चार महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त “लोकार्पणासाठी नेता मिळत नाही” म्हणून घाणेरड्या, फाटलेल्या कापडाने झाकून ठेवला आहे. या चार महिन्यांत विमानतळासाठी, दहीहंडी, दिवाळी, दसरा… सगळ्या कार्यक्रमांना नेते पोहोचले. मग आपल्या स्वराज्याचे संस्थापक, आपल्या आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करायला त्यांना एक तासही मिळाला नाही का? निवडणुकांच्या वेळी महाराजांचा जयजयकार करणारे, भाषणातून शिवरायांच्या नावावर टाळ्या घेणारे… यांना पुतळ्याचे लोकार्पण करायला वेळ नाही? हे महाराष्ट्रात घडतंय, हेच लाजिरवाणं आहे".
"म्हणूनच, आज जेव्हा मी आणि माझे सहकारी पुतळ्याजवळ पोहोचलो, तेव्हा एकच भावना सगळ्यांच्या मनात होती, ‘महाराजांना अशा अवस्थेत आम्ही अजिबात पाहणार नाही’. सगळ्यांनी ठामपणे सांगितलं की हा अपमान आता थांबायलाच हवा. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळूनच ठरवलं की हा पुतळा आजच लोकांच्या दर्शनासाठी खुला करायचा. पण तेव्हाही पोलीसांनी आमच्या सहकाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यासाठीही आता अडथळे? एवढी घाणेरडी पातळी गाठलीये का? हे नेमकं कोणाच्या आदेशाखाली चाललंय? हा माझ्या महाराजांचा महाराष्ट्र आहे".
"त्यामुळे ही माझ्या आयुष्यातील पहिली राजकीय केस असेल, तर मला आनंद आहे की ती माझ्या महाराजांसाठी आहे आणि भविष्यात महाराष्ट्राच्या, महाराजांच्या सन्मानासाठी दहा नव्हे, दहा हजार वेळा पुढे उभं राहावं लागलं तर मी तयार आहे. पण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी कुणाला खेळ करू देणार नाही. महाराजांच्या सन्मानासाठी पुढे येणं ही आमची जबाबदारी होती, आणि आम्ही ती पार पाडली. त्यामुळे आजपासून महाराजांचा हा पुतळा विधीवत पूजेसह नवी मुंबईकरांसाठी दर्शनाकरिता खुला असेल, असे आम्ही जाहीर करतो. ही लढाई इथेच थांबणार नाही. महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान कुठेही झाला, तर मनसे त्याला थेट उत्तर देईल. आम्ही कोणाला घाबरणारे नाही, आणि शिवरायांसाठी तर अजिबात नाही.
जय महाराष्ट्र,
जय शिवराय."
#अमितठाकरे #नवीमुंबई #छत्रपतीशिवाजीमहाराज़#AmitThackeray #NaviMumbai#ChhatrapatiShivajiMaharaj #MNSAdhikrut #MNVSAdhikrut pic.twitter.com/LkRLF0TWmE — MNVS Adhikrut – मनविसे अधिकृत (@MNVS_Adhikrut) November 16, 2025