उस्मानाबाद शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या उरुसाच्या धार्मिक कार्यक्रमावेळी सांड उधळल्याने १४ भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी जवळपास १५ हजार भाविक उपस्थित होते. अचानक सांड उधळल्याने मोठी धावपळ उडत चेंगराचेंगरी झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पोलिस आणि वैद्यकीय पथक तात्काळ हजर झाल्याने गर्दीवर नियंत्रण आणि जखमीवर उपचार झाले आहेत.
उरूसस्थळी उपस्थित पाेनि उस्मान शेख यांच्या पथकाने भाविकांमध्ये उडालेल्या गाेंधळावर तात्काळ नियंत्रण मिळले. तर दुसरीकडे जखमी चाैदा ते पंधरा भाविकांना माजी उपनगराध्यक्ष खलीफा कुरेशी, मसूद शेख, बबलू शेख, शमियाेद्दीन मशायक, अझहर शेख, बाबा मुजावर, जमीर शेख, अन्वर शेख, इस्माईल शेख, वाजीद पठाण यांच्यासह आदींनी तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले.
दरम्यान, जखमी रूग्णालयात दाखल हाेताच तिथे उपस्थित जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राजाभाऊ गलांडे, डाॅ. कुरूंद, डाॅ. राऊत यांच्या टीमने तातडीने उपचार केले. जखमी भाविकांत सर्वाधिक अकराजण उस्मानाबादेतील असून दाेघे कर्नाटक राज्यातील तर एकजण परंडा येथील आहे.