मुंबई, २४ मे २०२३, प्रतिनिधी : ज्ञानवापी प्रकरणाची गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे.अखेर आता या प्रकरणावर वाराणसी कोर्टाने ज्ञानवापीबाबत मोठा निर्णय दिला आहे. यावेळी ज्ञानवापी प्रकरणाशी संबंधित ७ याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांनी २२ मे रोजी हा निर्णय जाहीर केला.
ज्ञानवापी प्रकरणातील सातही याचिकांची एकत्रित सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे. जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशानुसार, ‘ही सर्व प्रकरणे वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित राहिल्यास परस्परविरोधी आदेश निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी होणे हिताचे ठरेल. म्हणूनच या प्रकरणावर येत्या ७ जुलै रोजी योग्य तो निर्णय घेतला जाईल.
या निर्णयावर मुस्लीम पक्षातर्फे विरोध केला जात आहे. या बद्दल मुस्लिम पक्षाचे वकील मोहम्मद तौहीद खान म्हणाले की,” ज्ञानवापीशी संबंधित मुद्द्यांची एकत्रित सुनावणी व्हावी अशा टप्प्यावर अद्याप हे प्रकरण पोहोचलेले नाही. त्यामुळे न्यायालयाने सर्व प्रकरणांचे पुरावे तपासायला हवे होते आणि पुरावे तेच राहिले असते तर असा निकाल देणे योग्य ठरले असते.”