एकीकडे ऑपरेशन टायगर सुरु असताना चंद्रपूरात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीपासून विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये रंगलेला डाव प्रतिभा धानोरकर यांनी जिंकला आहे. चंद्रपूर काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राजेश अडूर यांची गटनेतेपदावरून पाय उतार झाली असून सुरेंद्र अडबाले नवे गटनेते निश्चित झाले आहेत. काँग्रेसच्या 16 नगरसेवकांच्या बहुमताने सुरेंद्र अडबाले यांची निवड केल्यामुळे चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेतृत्वात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यावेळी काँग्रेसच्या 27 पैकी 16 नगरसेवक सुरेंद्र अडबाले यांच्या पाठीशी असून विभागीय आयुक्तांकडून सर्वोच्च न्यायालयाचा दाखला मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देताना गटनेता निवडला जातो. दरम्यान राजेश अडूर यांची गटनेता म्हणून नोंदणी रद्द झाली असून 17 जूनपासून सुरेंद्र अडबाले यांच्या निवडीची अधिकृत नोंद घेतल्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसचे दिग्गज नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांना मोठा धक्का बसला आहे. यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेना ऑपरेशन टायगर
शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली असून स्वतःचा वेगळा गट निर्माण केला आहे. यात ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे. दरम्यान आता हे खासदार शिवसेना शिंदे गटात विलीन होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
तर दुसरीकडे 2029 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळावं असं आश्वासन संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांना भाजप पक्षश्रेष्ठीकडून हवं आहे. मात्र अद्याप भाजपकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने दोन्ही खासदारांनी अद्याप पाठिंब्याच्या पत्रावर सही केली नसल्याचे समोर आले आहे. जर आज रात्रीपर्यंत भाजपकडून आश्वासन मिळाले नाही तर संजय दिना पाटील उद्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या बैठकीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बदलत्या भूमिकेचा ठाकरे गटाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.