भुसावळ शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. अशातच नारायण नगर परिसरातील विशाल झोपे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नारायण नगर परिसरात एका मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अवघ्या 9 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 24 एप्रिल रोजी तारकेश विशाल झोपे वयवर्षे 9 हा विद्यार्थी सकाळी शाळेत जात असताना त्याच्यावर अचानक एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यावेळी कुत्र्याचा हल्ला इतका तीव्र होता की, त्या हल्ल्यात तारकेशच्या चेहऱ्यावर आणि नाकावर गंभीर जखमा झाल्या ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर तब्बल 80 टाके पडले. मात्र तरी देखील त्याची दुखापत हलकावत नव्हती.
प्रकृती गंभीर होत गेल्याने त्याच्यावर प्लास्टिक सर्जरीची गरज भासली. यामुळे पुढील उपचारासाठी त्याला मुंबई येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज मृत्यूशी झुंज देत असताना त्याची प्राणज्योत मालवली. या मुलाच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना रस्त्यावरून ये-जा करताना सतत धोका निर्माण होत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.