पैठण तालुक्यातील पाचोडमधील कल्याणनगर भागात राहणाऱ्या एका 25 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात आत्महत्या केली. राहत्या घरात पंख्याला साडी बांधून त्या साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आकाश सोमनाथ शेळके (वय 25) असे आत्महत्या करणार्या व्यक्तीचे नाव आहे. पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याणनगर भागामध्ये राहणारा आकाश सोमनाथ शेळके याचे आई-वडील मागील महिन्यामध्ये ऊसतोडी कामगार असल्याने बाहेरगावी गेलेले.
तर पत्नी ही गेल्या काही दिवसांपासून माहेरी राहत असल्याने तो अनेक दिवसांपासून चिंताग्रस्त होता. शुक्रवारी सायंकाळी आकाश उशिरा जेवण करून स्वतःच्या घरी झोपला होता. मात्र शनिवारी त्याचे घर लवकर उघडले नसल्याने त्याच्या मावसबंधूने घर उघडून पाहिले आणि त्याला आकाश राहत्या घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनात आले.
यावेळी त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला असता, त्याच्या घरातील नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन या घटनेची माहिती तात्काळ 112 वर दिली. यानंतर बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचून आकाश शेळकेला स्थानिक नागरिकाच्या मदतीने फासावरून खाली उतरून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीपान काळे यांनी त्याला तपासून मृत्यू घोषित केले आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.