मुंबई, ८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबईला ७ धरणांच्या तलावांतून पाणीपुरवठा होतो. या ७ तलावांमध्ये सध्या ८०.३२ टक्के पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी तलावांमध्ये ९०.०१ टक्के पाणीसाठा होतो. यंदा त्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली आहे. यामुळे पाणीकपात आणखी काही दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईच्या तलावांची पाणी साठवण्याची क्षमता १७ लाख ७८ हजार दशलक्ष लिटर एवढी आहे. वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी मुंबईच्या तलावांना १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. सध्या धरणांमध्ये ११ लाख ६२ हजार ४५१ दशलक्ष लिटर पाणी आहे. उपलब्ध पाणीसाठा मुंबईची ३०२ दिवसांची तहान भागवण्यास पुरेसा आहे.
मुंबईला दररोज ४२०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. सध्या मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा सुरू आहे.
कोणत्या तलावात किती पाणीसाठा ?
भातसा : ५ लाख २४ हजार ४३९ दशलक्ष लिटर
अप्पर वैतरणा : १ लाख ४३ हजार ७०० दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा : १ लाख ८५ हजार ९३२ दशलक्ष लिटर
मोडकसागर : १ लाख २८ हजार ९२५ दशलक्ष लिटर
तानसा : १ लाख ४३ हजार ७१० दशलक्ष लिटर
तुळशी : ८०४६ दशलक्ष लिटर
विहार : २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर