मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह राणा दाम्पत्यानी केला होता त्यानंतर त्यांना तुरूंगात जावं लागलं होतं. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर राणा दाम्पत्य दिल्ली मध्ये राहत होतं. आता ३६ दिवसांनी राणा दाम्पत्य अमरावतीत दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी स्वाभिमान यावा पक्षाकडून करण्यात आलेली होती. रात्री अमरावतीच्या दसरा मैदानात हनुमान मंदिरात राणा दाम्पत्याकडून हनुमान चालिसा आणि महाआरती केली जाणार आहे. राणा दाम्पत्याचं जंगी स्वागत करण्यात आले.
तर दुसरीकडे राणा विरुद्ध शिवसेना आक्रमक होताना दिसते आहे. गेले ३६ दिवस अमरावती जिल्हा विकासापासून दूर राहिला, अशा आशयाचे फलक अमरावतीच्या पंचवटी चौकात सेनेकडून लावण्यात आले आहे. ३६ दिवस राणा दाम्पत्य अमरावतीमध्ये नसल्याने अमरावती जिल्हा विकासापासून दूर राहिला. मतदारांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी गायब होते. अमरावती जिल्हातील नागरिक हे महागाई आणि बेरोजगारिने त्रस्त झाले आहेत. आता महागाई, बेरोजगारिचा प्रश्न त्यांनी सोडवावा अशा प्रकारचे बॅनर लावून शिवसैनिकांनी दर्शवला आहे.
काय आहे प्रकरण ?
राणा दाम्पत्याने शनिवारी (२३ एप्रिल) मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते मुंबईत दाखल झाले होते. मात्र, राणा दाम्पत्याच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांच्या खार येथील घराला चहू बाजूंनी शिवसैनिकांनी घेराव घातला होता. त्यामुळे त्यांना हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मातोश्रीसमोर पोहचता आले नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राणा दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं सांगितलं. मात्र, घडल्या प्रकरणाच्या परिणामी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली होती.