पुणे : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापुर गावात एका चार वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिला निर्घृणपणे संपवण्याची धक्कादायक घटना घडली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या आजीकडे आलेल्या या चिमुरडीवर ६५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार करून तिचा खून केल्याचे समजते. या घटनेने परिसरात, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी रास्कारोको केला. शुक्रवार, १ मे रोजी ही घटना घडली. दुपारच्या वेळी चिमुकली नसरापूर राम मंदिर परिसरात खेळत असताना त्या नराधमाने तिला आमिष दाखवत तिथून जवळच असलेल्या एका गुरांच्या गोठ्यात नेऊन निर्दयीपणे अत्याचार केले, त्यानंतर तिचा खून केला. बऱ्याच वेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने घरच्यांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. शोधाशोध करून देखील मुलगी सापडत नसल्याने नागरिकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना चिमुकली एका व्यक्तीसोबत गोठ्यात जाताना दिसली. यावरून त्या भागात कुटुंबियांनी शोध घेतला असता गोठ्यामध्ये तिचा झाकलेल्या अवस्थेक मृतदेह आढळून आला.
दरम्यान, नागरिकांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला असता गावच्या नदीकडील भागात तो नराधम सापडला. पोलिसांनाही या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या नराधमाला ताब्यात घेतले. या संतापजनक घटनेमुळे नसरापूरमधील ग्रामस्थांनी एकत्र येत नराधमाला ग्रामस्थांच्या ताब्यात देण्याची मागणी पोलिसांकडे केली. यासाठी नागरिकांनी रास्तारोको केला. परिणामी, आज शनिवारीदेखील येथील नागरिकांचं आंदोलन सुरू असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.