जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भंवरखेडे येथे शेतात काम करत असताना मुसळधार पावसामुळे झाडाखाली आश्रयाला असलेल्या पाच जणांवर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. सासू-सासरे आणि दोन सुना यात मृत्यूमुखी पडल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात भंवर खेडे गावाजवळील हिवरे शिवारामध्ये शेतात काम करत असलेल्या रघुनाथ दशरथ पाटील यांच्या परिवारातील सदस्यांवर वीज कोसळल्याने त्यात रघुनाथ पाटील यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झालेला आहे यात रघुनाथ दशरथ पाटील हे पन्नास वर्षे वयाचे शेतकरी ,त्यांची पत्नी अलका रंगनाथ पाटील, दोन्ही सुना लता उदय पाटील आणि शोभा भागवत पाटील आणि त्याचबरोबर रोजंदारीवर काम करणारी महिला कल्पना भैय्या पाटील या पाच जणांचा मृत्यू झालेला आहे.
पाच पैकी चार जण महिला आहेत पावसापासून बचावासाठी शेतातील एका झाडाखाली असलेला हा शेतकरी परिवार बसलेला असताना झाडावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी पोहोचले असून धरणगाव ग्रामीण रुग्णालयांमध्ये यांचे मृतदेह हलविण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी शोककळा पसरली आहे. शेतकरी कुटुंबावर हा निसर्गाचा घाला झालेला आहे आणि सासू-सासऱ्यांचा दोन सुनांचा दुर्दैवी मृत्यू एकाच ठिकाणी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.