ठाण्यातील खंडणी प्रकरणात मागील अनेक दिवसांपासून ठाणे कारागृहात असलेला डॉन दाऊद इब्राहिम चा भाऊ इकबाल कासकर हा न्यायालयाच्या आदेशानंतर उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात साडे अकरा वाजता दाखल झाला. मात्र संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तो सिव्हिल रुग्णालयात आवारात फिरून नातेवाईकांना भेटणे जेवण करणे आणि सिगारेट ओढणे एवढेच नाही तर गाडीत बसून चक्क बिर्याणीवर देखील कासकर याने तावही मारला. हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या समोर आणि त्यांच्या संरक्षणातच सुरू होता. तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी 6 वाजता खिशातून पैसे काढून संरक्षणात असलेल्या पोलिसांना पैसे वाटप करून संध्याकाळी तो पुन्हा ठाणे कारागृहात परतला या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ वायरल झाला आणि या प्रकरणी आता पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
एकीकडे कारागृहातील कैद्यांना सुरक्षा देण्यासाठी आवश्यक असलेला बंदोबस्त नसल्यामुळे अनेकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केली जाते. मात्र आपले राजकीय वजन वापरून कैदी कसे न्यायालयातील तारखेच्या नावाने बाहेर येतात आणि बाहेर येऊन आपल्या मित्र मंडळींसह भेटीगाठी आणि मेजवानी झोडतात, याचा धक्कादायक पुरावा ठाण्यात सिव्हिल रुग्णालयात पाहायला मिळाला आहे. इकबाल कासकर याच्यावर ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर मोक्का नुसार कारवाईही करण्यात आली असून त्याने बांधकाम व्यावसायिकांना धमकवले होते. या प्रकरणाची सुरवात झाली तेव्हा पहिल्यांदा इकबालला अटक करून कोठडीत टाकल्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी इकबाल खंडणी प्रकरणात अनेक राजकीय नेते देखील सहभागी असल्याचे सांगितले होते मात्र कालांतराने या प्रकारात अशी कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही.
न्यायालयात घेऊन गेल्यावर आरोपीची आधी मेडिकल करून त्याला न्यायालयात हजर केले जाते याचाच फायदा अनेक कैदी घेऊन आपल्या ऐशो आरामासाठी सिव्हिल रुग्णालयाचा वापर करत असल्याचे या आधीही अनेकदा समोर आले आहे. पुन्हा एकदा उपचाराच्या नावाने ठाणे सिव्हिल रुग्णालयात इकबालची ऐय्याशी सुरु होती आणि ते ही पोलीस संरक्षणात सिव्हिल रुग्णालयात काम करणारे काही कर्मचारी नेहमी अशा प्रकारच्या व्हीव्हीआईपी आरोपींना सुविधा पुरवण्याचे काम करत असून त्यासाठी त्यांना मोबदलाही दिला जातो.
आम्ही न्यायालयाच्या आदेशाने इकबालला उपचारासाठी संरक्षणात रवाना केले होते. याआधी आम्ही संबंधित यंत्रणांना लेखी पत्र दिले असून त्याची योग्य ती सुरक्षा देण्याचे काम आमचे आहे कारागृहाच्या बाहेर काय होते त्याचा आमच्याशी संबंध येत नाही अशी प्रतिक्रिया ठाणे कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली.
या सर्व प्रकारावर सिव्हिल सर्जन डॉक्टर कैलास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “इकबाल आमच्याकडे दाताच्या ट्रीटमेंट साठी आला होता आणि शुगर प्रॉब्लेम असल्यामुळे त्याचे रक्त घेऊन त्याची ट्रीटमेंट दुपारी 12.30 वाजता संपली” असे सांगितले आहे. त्यामुळे इकबाल साडे बारा पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बिनदिक्कत आपल्याला हवे ते करत होता ते ही पोलिसांच्या संरक्षणात हे विशेष. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तलयाकडून संपूर्ण चौकशी करत त्वरित पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.