वृत्तसंस्था, नवी दिल्ली
12 जानेवारीला इस्रोतर्फे भारतीय बनावटीचा शंभरावा उपग्रह अंतराळात सोडला जाणार आहे. सकाळी 9.29 वा पीएसएलव्ही सी 40/कार्टोसॅट 2 मिशनचं प्रक्षेपण होईल. इस्रोतर्फे श्रीहरीकोटा या प्रक्षेपण केंद्रावरुन शंभरावा उपग्रह अंतराळात सोडणार आहे. इस्रोची ही शंभरावी ‘गगन’भरारी असल्याने जागतिक पातळीवर याचे विशेष महत्व आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन अर्थात इस्रोने दिलेल्या माहितीनूसार यात एकूण 31 पैकी 28 विदेशी उपग्रहांचा समावेश असेल. यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये इस्रोनं 104 उपग्रह आवकाशात पाठवून आपल्या नावे वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता.
भारतासाठी आजची मोहीम ऐतिहासिक असणार आहे. कारण गेल्या वर्षी इस्रोचं पीएसएलव्ही सी 39 हे मिशन अपयशी ठरलं होतं. त्यानंतर इस्रोने पुन्हा जोमाने तयारी करुन, पीएसएलव्ही सी 40 हा प्रक्षेपक हवेत झेपावण्यास सज्ज केला आहे. कार्टोसॅट 2 हा उपग्रह म्हणजे भारताचा ‘आकाशातील डोळा’ म्हणून ओळखला जात आहे. आकाशातून पृथ्वीचे फोटो घेण्याची क्षमता या उपग्रहात आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमांवर शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी हे महत्त्वाचं काम करणार आहे. हा उपग्रह पृथ्वीची अवलोकन करणारी उच्च दर्जाची छायाचित्र पाठवणार आहे.