नाशिक शहर आणि परिसरात आज सकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली असून, संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून, सध्या धरणातून सुमारे 14 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. काल आलेला गोदावरीचा पूर आज दुसऱ्या दिवशीही कायम असून, नदीकाठच्या काही रहिवासी भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला असून, सुमारे 300 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. यावेळी नाशिकच्या चांदोरी गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेत 40 कुटुंबातील सदस्यांना सायखेडा परिसरातील गोदावरी सोसायटीत हलवले आहे. तसेच गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने नागरिकांना जेवण आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, गोदावरी नदीलगतच्या सराफा बाजारातही पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाऊस अशाच पद्धतीने सुरू राहिल्यास गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. मुसळधार पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी संततधार पाऊस कायम असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात दरड कोसळली
तर दुसरीकडे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धुळीपाडा रस्त्यावर दरड कोसळली आहे. मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर नांदगाव, कोहोळी, खरवळसह 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला आहे. यावेळी नागरिक आणि प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.