मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी : ओडिशा राज्यातील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने आज मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणी रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. ओडिशामध्ये २ जून रोजी झालेल्या दुर्घटनेप्रकणी शु्क्रवारी केंद्रीय तपास एजन्सी ने मोठी कारवाई केली आहे. सेक्शन इंजीनिअर मोहम्मद आमिर खान, अरुण कुमार मोहंता आणि टेक्नीशियन पप्पू कुमार यांना सीआरपीसी कलम ३०४ व २०१ नुसार अटक केली आहे.
दोन जून रोजी रात्रीच्या सुमारास ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यातील बाहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर उभी असलेली एक मालगाडी आणि दोन एक्सप्रेस ट्रेन दुर्घटनाग्रस्त झाल्या होत्या. यामध्ये पश्चिम बंगालमधील शालिमारहून चेन्नईकडे जात असलेली कोरोमंडल एक्सप्रेस, बेंगळुरु-हावड़ा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि एका मालगाडीचा समावेश होता. या अपघातात २९३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले होते. दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी गठित उच्चस्तरीय समितीने आपल्या अहवालात सांगितले की, अपघाताचे कारण चुकीचा सिग्नल आहे. समितीने या प्रकरणी सिग्नलिंग व दूरसंचार (एस एंड टी) विभागातील अनेक चुकांवर बोट ठेवले. त्याचबरोबर संकेत दिला की, जर योग्य सिग्नल दिला असता तर दुर्घटना टाळता आली असती. रेल्वे सुरक्षा आयोग (सीआरएस) कडून रेल्वे बोर्डाकडे सोपवलेल्या स्वतंत्र चौकशी हवालात म्हटले की, सिग्नलिंग कामात त्रुटी असूनही बाहानगा बाजार स्टेशन व्यवस्थापकाने एस एंड टी कर्मचाऱ्यांना सूचना दिली असती तर त्यावर उपाय करता आले असते.