जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नळपाडयातील रघुवीरनगर भागात तीन जणांनी दारुच्या नशेतच वसीम रशिद खान या तरुणाच्या गळयावर दारुच्या बाटलीने आणि चाकूने वार करुन त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडलीय. रविवारी संध्याकाळी श्रीपत पाटील उद्यानाजवळ ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी अरशद अबुलहसन खान, विवेक सिकंदर यादव आणि रतनलाल उर्फ सोनू राजनाथ यादव याना अटक केली. या तिघांनाही 31 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
धर्मवीरनगरच्या कमानीजवळील एका मोकळया मैदानात वसिम आणि त्याचे काही साथीदार दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बसले होते. त्यावेळी तिथे आलेल्या चौघा जणांच्या टोळक्याने त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर फुटलेल्या बाटलीने आणि चॉपरने वार केले. या हल्ल्यात प्रचंड प्रमाणात रक्तस्त्रव झाल्याने वसीमचा जागीच मृत्यु झाला. ही हत्या झाल्यानंतर तो बराच काळ तशाच अवस्थेत घटनास्थळी निपचित पडून होता.
स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर चितळसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.