जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईच्या दिशेनं कूच करणाऱ्या ओखी वादळाचा धोका टळल्याचं समजतं आहे. मुंबईपासून साधारण 200 किलोमीटरवर असलेलं ओखी चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेनं सरकलंय.
त्यामुळे धास्तावलेले तमाम मुंबईकर, तसेच कोकण किनारपट्टीवरील नागरिकांनी मंगळवारी सुटकेचा निःश्वास सोडलाय.. तरी मुंबई, ठाणे, पालघर परिसरात आज, बुधवारी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गप्रमाणेच गोव्याच्या किनारपट्टीवरही ओखी वादळाचा परिणाम काल पाहायला मिळाला.
रत्नागिरीत काही ठिकाणी किनारपट्टीलगतच्या वस्त्यांमध्ये समुद्राचं पाणीही शिरलं होतं. सोमवार रात्रीपासून लाटांचं तांडव सुरु असल्यामुळं मच्छिमार बांधवांमध्ये भीतीचं वातावरण होतं.
मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजता मिळालेल्या माहितीनुसार, ओखी चक्रीवादळ गुजरातमधल्या सूरतपासून 250 किलोमीटर अंतरावर होतं. ओखी वादळाच्या संभाव्य धोक्यामुळे मोदी आणि अमित शाह यांच्या सभा रद्द करण्यात आल्या.