नाशिक, ८ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून ते उमेदवार जाहीर होईपर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघ जास्त चर्चेत राहिला. कारण नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. महायुतीकडून नाशिकमध्ये शिवसेना की राष्ट्रवादीला उमेदवारी मिळते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते पण अखेर नाशिक लोकसभेसाठी शिवसेनेला उमेदवारी मिळाली. महायुतीकडून हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. गोडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदा नाशिक दौऱ्यावर आहेत. शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी प्रचाराचा प्लॅन ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलतील आणि प्रचाराची दिशा कशा पद्धतीने असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.