मुंबई, १ मे २०२४, प्रतिनिधी : संजय निरुपम पुन्हा एकदा शिवसेनेच्या वाटेवर आहेत. निरुपम यांनी ३ मे रोजी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या संजय निरुपम यांनी राज्यसभेचा खासदार होण्यापर्यंतचा प्रवास केला. यानंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकदा काँग्रेसकडून लोकसभेत खासदार म्हणून गेलेले निरुपम काही काळ मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. पक्ष नेतृत्वाशी मतभेद झाल्यामुळे निरुपम यांनी नाराजी जाहीर करायला सुरुवात केली. काँग्रेसने निरुपम यांना पक्षातून निलंबित केले. यानंतर काही दिवस सूचक मौन बाळगणाऱ्या निरुपम यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबईत बाळासाहेब भवनाला भेट दिली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली.