नाशिक, २५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिरुर लोकसभा मतदारसंघातून लढा, असा प्रस्ताव शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादर केला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोन करून हा प्रस्ताव माझ्यापुढे मांडला, असे राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या प्रस्तावाच्या वृत्ताला दुजोरा दिला. पण पक्षाचा आणि त्यांचा या प्रस्तावावरील निर्णय जाहीर केला नाही. नाशिकची जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. अद्याप ही जागा राष्ट्रवादीने सोडलेली नाही, असे भुजबळांकडून सांगण्यात आले. यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा पेच सुटलेला नाही.
नाशिकमधून लढण्यासाठी शिवसेनेचे हेमंत गोडसे उत्सुक आहेत. राष्ट्रवादीचे भुजबळ पण हीच जागा लढवण्यास उत्सुक होते. पण काही दिवसांपूर्वीच भुजबळांनी नाशिकमधून माघार घेतल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे भुजबळांनी माघार घेतल्याचे जाहीर केले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकची जागा सोडली असल्याचे जाहीर केलेले नाही.