मुंबई, प्रतिनिधी, दि. १० एप्रिल २०२४ : रेल्वे प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतलाय. बोरिवलीपर्यंत २ टप्प्यांत हार्बर मार्गाचा विस्तार होणार आहे. मुंबईत दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेने हार्बर मार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोरिवलीपर्यंत पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे असे दोन पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध होतील.
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्या बोरिवली ते विरारदरम्यान वाढली आहे. यामुळे हार्बर विस्तारीकरण जलदगतीने पूर्ण करण्यासाठी गोरेगाव ते मालाड (२ किमी) आणि मालाड ते बोरिवली (६ किमी.) असा मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगावपर्यंत हार्बर सेवा आहे. गोरेगाव ते मालाड पहिला टप्पा सन २०२६-२७ आणि मालाड ते बोरिवली दुसरा टप्पा २०२७-२८पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी ८२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.