विदर्भ, प्रतिनिधी, दि. ९ एप्रिल २०२४ : मराठवाड्यात पाणीटंचाईची समस्या बिकट झाली आहे. धरणात पाणीसाठा शिल्लक नसल्यामुळे नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात एकूण २०.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाच जिल्ह्यांत ९७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गावोगावी पाण्याची गरज लक्षात घेऊन १३७५ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
जायकवाडी धरणात १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणावर चार जिल्हे पूर्ण अवलंबून आहेत. पिण्याचे पाणी, सिंचन आणि उद्योगासाठी जायकवाडीवर मोठा भाग अवलंबून आहे. येलदरी धरणात ३८ टक्के, सिद्धेश्वर ११, मांजरा ७, उर्ध्व पैनगंगा ४९, निम्न तेरणा ३, निम्न मनार ३०, विष्णुपुरी ३८, निम्न दुधना धरणात ०७ टक्के असा धरणनिहाय पाणीसाठा आहे. माजलगाव आणि सिना कोळेगाव धरण कोरडे आहे. पुरेसे पाणी नसल्यामुळे गावोगावी पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. शिवाय, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.