चंद्रपूर, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभेच्या जागांच्या संख्येच्या बाबतीत देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे सर्वात महत्वाचे राज्य मानले जाते. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. याचनिमित्ताने सर्च पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीये. अशातच आज पूर्व विदर्भात पहिल्या टप्यातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी चंद्रपूरमध्ये सभा घेणार आहेत. मोदींची ही महाराष्ट्रातील पहिली सभा आहे. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात भाजप महाराष्ट्रात संपूर्ण ताकद पणाला लावत आहे. आज एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरमधील सभेतून महाराष्ट्राला साद घालणार आहे, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील आज विदर्भात सभा घेणार आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाटमध्ये भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ योगी सभा घेणार आहेत. त्यानंतर भंडारा गोंदियामध्ये सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ आणि सायंकाळी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ सभा घेणार आहेत.