नवी दिल्ली, २७ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी संपली. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या मतदारसंघांमध्ये मुख्य लढती या भाजपा विरुद्ध काँग्रेस अशाच आहेत.
रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसच्या रश्मी बर्वे अशी लढत होणार आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे अशी लढत होईल. भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुनिल मेंढे, काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोले आणि वंचितचे संजय केवत या तीन जणांमध्ये लढत होणार आहे. गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे अशोक नेते, काँग्रेसचे नामदेव किरसान आणि वंचितचे हितेश मडावी या तीन जणांमध्ये लढत होईल. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि वंचितचे राजेश बेले या तीन जणांमध्ये लढत होणार आहे.
पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस ३० मार्च हा आहे. मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे.