छत्रपती संभाजीनगर, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घरगुती आणि औद्योगिक सात लाख ५० हजार २५४ ग्राहकांकडे ११९ कोटी रुपये वीजबिल थकीत आहे. या प्रकरणाची दखल घेत महावितरणने कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत दीड हजार जणांची वीजजोडणी तोडण्यात आली आहे. मार्च अखेरपर्यंत ९८ कोटींची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महावितरणच्या पथकाने मागील वीस दिवसांत ५४ कोटींची वसुली केली आहे. उर्वरित वीज ग्राहकांनी भरणा केला नाही तर त्यांची वीजजोडणी तोडण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.