जालना, २४ मार्च २०२४, प्रतिनिधी : जालन्यातील अंतरवाली सराटी येथील रामगव्हाण रोडवरील मैदानावर आज (२४ मार्च रोजी ) सकाळी १० वाजता मराठा समाजाची राज्यस्तरीय महासंवाद बैठक होणार आहे. या बैठकीत मनोज जरांगे पाटील काय भूमिका मांडतील ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीसाठी मैदानावर मंडप उभारण्यात आला असून, पोलिसांचाही मोठा बंदोबस्त राहणार आहे.बैठकीसाठी एक दिवस आधी येणाऱ्यांची बैठकस्थळी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था परिसरातील नागरिकांकडून होत आहे. त्याशिवाय पाणी, पार्किंग, वाहतूक व्यवस्था आदींचे नियोजन केले जात आहे. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करून पुढील दिशा ठरविली आहे.
बैठकीच्या बंदोबस्तासाठी २७ अधिकाऱ्यांसह २०० कर्मचारी राहणार आहेत. बैठकीच्या विविध १७ ठिकाणी हे अधिकारी, कर्मचारी बंदोबस्ताचे काम पाहणार आहेत. बैठकीवर ड्रोनची नजर असणार आहे. वडीगोदी व अंतरवाली सराटी परिसरात धुळे-सोलापूर महामार्गावर वडीगोदी, वडीगोदी टी पॉइंट, रामगव्हाण फाटा, अंतरवाली सराटी, बैठक ठिकाणचे मैदान, पार्किंग आदी ठिकाणी पोलिस बंदोबस्त असणार आहे.