नवी दिल्ली, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : देशातील नागरिकांना मोदींचे पत्र व्हॉट्सअॅप करणे थांबवा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला दिले आहेत. हे निर्देश मिळताच सरकारने मोदींचे पत्र व्हॉट्सअॅप करणे थांबवले आहे.
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत संकल्पना या विषयाशी संबंधित एक पत्र देशातील नागरिकांना व्हॉट्सअॅप करत होते. पण आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर मोदींचे पत्र व्हॉट्सअॅप करणे थांबवा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला दिले. हे निर्देश मिळताच सरकारने मोदींचे पत्र व्हॉट्सअॅप करणे थांबवले आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतरही नागरिकांना मोदींचे पत्र मिळत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली होती. यावर उत्तर देताना पत्र आधीच पाठवले होते. पण तांत्रिक कारणामुळे काही जणांना आचारसंहिता लागू झाल्यावर अर्थात उशिराने पत्र व्हॉट्सअॅपवर मिळाले आहे, असे
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने निवडणूक आयोगाला कळवले आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने अहवाल मागितला आहे.