नवी दिल्ली, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी एक महत्वाची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे शक्य नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुका संपल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. सहा वर्षांपासून येथे विधानसभेची निवडणूक झालेली नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका होणार आहेत.