मुंबई, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल. त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. विद्यार्थ्यांचे गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.