मुंबई, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : देशातील पहिल्या एलएनजी (लिक्विफाइड नॅचरल गॅस) इंधनावर रूपांतरीत करण्यात येणाऱ्या एस.टी महामंडळाच्या वाहन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले. एसटी महामंडळातील ५००० डिझेल वाहनांचे एलएनजी (लिक्विफाइड नॅचरल गॅस) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
महामंडळाकडे डिझेलवर चालणारी सुमारे १६००० प्रवासी वाहने आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा इंधनावर म्हणजेच डिझेलवर केला जातो. डिझेलच्या दरात होणारी वाढ लक्षात घेता व हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरणे ही काळाची गरज आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने पूर्ण एस.टी महामंडळातील वाहने एलएनजी इंधनावर आधारित करण्यात येणार आहे.