नवी दिल्ली, दि. १५ मार्च, २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे राज्यातील मतदारसंघाचे जागावाटप आता अंतिम टप्यात येऊन पोहोचले आहे. गुरुवारीच भाजपाने राज्यातील त्यांचे २० उमेदवारांची यादी जाहीर केली. हे मतदारसंघ भाजपचे पारंपारिक मतदारसंघ आहेत. त्यानंतर आता उरलेल्या २८ लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॅाग्रेस यांना कोणते मतदारसंघ सोडले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
महायुतीच्या महाराष्ट्रातील जागावाटपासंदर्भात आज नवी दिल्लीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजपा ३१ , शिवसेना १३ आणि राष्ट्रवादी ४ असा जागावाटपाचा फॉर्मुला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आज संध्याकाळी याबद्दलची शेवटची चर्चा दिल्लीमध्ये होणार असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.