मुंबई, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. हा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीची पुढील बैठक शनिवार ९ मार्च २०२४ रोजी होणार आहे. मविआने वंचित बहुजन आघाडीला तीन ते पाच जागा देण्याची तयारी दाखवली आहे. पण हा प्रस्ताव वंचितला अमान्य आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडी लोकसभेची २०२४ ची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची चर्चा आहे. याआधी २०१९ मध्येही वंचित बहुजन आघाडीने लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. पण २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचितला एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता. आता यावेळी वंचित काय करणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मविआच्यावतीने बोलताना खासदार संजय राऊत यांनी आघाडीत सगळ्यांच्या सगळ्या मान्य होणे कठीण आहे. सर्वांच्या मनाप्रमाणे होत नसतं. यामुळे आपल्या मनाप्रमाणेच होईल, असा हट्ट धरू नये; असे सूचक वक्तव्य केले. या वक्तव्यामुळेच वंचित मविआसोबत निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
मविआतल्या जागावाटपाचा मुख्य तिढा
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागा लढवल्या त्या जागा लढवण्यास यावेळीही उत्सुक आहे. पण काँग्रेसची भूमिका वेगळी आहे. सद्यस्थितीत महाविकास आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे तर शिउबाठा आणि राशप यांची राजकीय ताकद कमी झाली आहे. यामुळे राज्यात सर्वाधिक जागा लढवण्यास काँग्रेस उत्सुक आहे. याच मुद्यावरून महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा आहे. हा तिढा अद्याप कायम आहे.