नवी दिल्ली, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी गुरुवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. याआधी भाजपाने पहिल्या यादीद्वारे १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याआधीच भाजपाने १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. भाजपाच्या पहिल्या महाराष्ट्रातील एकाही उमेदावाराचा समावेश नव्हता. पण दुसऱ्या यादीद्वारे भाजपा महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं जाहीर करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ३० जागा भाजपा लढणार असल्याची चर्चा आहे. अद्याप या संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ३० जागा भाजपा तर १० जागा शिवसेना आणि ८ जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार अशी चर्चा आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. शिवसेनेने २०१९ च्या लोकसभेवेळी २३ जागा लढवल्या आणि १८ जिंकल्या होत्या. यामुळे जुनी आकडेवारी सांगत शिवसेनेचे निवडक नेते १० पेक्षा जास्त जागा लढवण्याची मागणी करत आहेत. यातून निर्माण झालेल्या तणावावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेवढ्या जागा लढलो तेवढ्या जागांसाठी आग्रही, असे शिवसेनेचे शंभूराज देसाई म्हणाले. त्यांनी महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे आणि लवकरच सूत्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.