नवी दिल्ली, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यापैकी ३० जागा भाजपा तर १० जागा शिवसेना आणि ८ जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आता उमेदवार निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. भाजपाच्या उमेदवार निश्चित करण्यासाठीच्या बैठकीत महाराष्ट्रातील सहा नेते सहभागी झाले आहेत. हे सहा नेते दिल्लीतील भाजपाच्या नेतृत्वाशी सल्लामसलत करून उमेदवार निश्चित करत असल्याचे वृत्त आहे. हाती आलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री आमदार आशिष शेलार, प्रविण दरेकर तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे दिल्लीतील भाजपाच्या नेतृत्वाशी सल्लामसलत करून उमेदवार निश्चित करत असल्याचे वृत्त आहे.