नाशिक, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : येत्या ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसेची जोरदार तयारी सुरु असून यंदा राज ठाकरे यांच्या आदेशाने वर्धापनदिन सोहळा नाशिक शहरात आयोजित करण्यात येणार आहे. नाशिकला मनसेचा बालेकिल्ला म्हणून देखील ओळखले जाते. १८व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे तसेच मनसेची राज्यातील वरिष्ठ नेतेमंडळी ७ मार्च रोजी नाशिक शहरात दाखल होणार आहेत.
मनसे पक्प्रमुख राज ठाकरे हे पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला काळाराम मंदिरात आरती करतील, तसेच या कार्यक्रमानंतर शहरातील मनसेच्या कार्यालयाचे तसेच शाखांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई नाका परिसरात असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात ९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. यावेळी पक्षाचे नेते मंडळी मनसैनिकांना मार्गदर्शन करतील. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच्या मनसेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात काय भूमिका मांडणार? याकडे मनसैनिकांसह सामान्य जनतेचं लक्ष लागलंय.