मुंबई, २७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनादरम्यान विधानसभेत बोलताना आशिष शेलार यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र बेचिराख होण्यापासून वाचवल्याचे वक्तव्य का केले ? महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना कुणी केली ? उपमुख्यमंत्र्यांना संपवून टाकू असं म्हणण्याचं बळ कुणी दिलं ? असा प्रश्नांचा भडीमार आशिष शेलार यांनी केला. यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनीही जरांगेंची चौकशी व्हायला हवी या भूमिकेचे समर्थन केले. अखेर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. त्यांनी विधानसभेत बोलताना चौकशीची घोषणा केली. मनोज जरांगेंना घरी जाऊन भेटणारे कोण होते, या आंदोलनामागे कोण होते ? याची चौकशी करण्यात येईल. या प्रकरणाची एसआयटी चौकशी होईल. चौकशी करून षडयंत्र बाहेर काढले जाईल, असे फडणवीस म्हणाले.